You are currently viewing कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतमाल वाहतूक, साठवणूक आणि विपणनाचे नियोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतमाल वाहतूक, साठवणूक आणि विपणनाचे नियोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतमाल वाहतूक, साठवणूक आणि विपणनाचे नियोजन

सध्या लॉकडाउनच्या काळामध्ये भाजीपाला, फळे, दुध, अन्नधान्ये व किराणा या बाबींची जनतेस नितांत गरज आहे. पैकी किराणा आणि अन्नधान्याचे चांगल्याप्रकारे नियोजन होत असून ग्राहकांना गरजेपुरती उपलब्धता आहे. परंतु नाशवंत शेती उत्पादनांच्या बाबतीत मागणी व पुरवठा समिकरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनास कठोर निर्बंध लागु करावे लागत आहेत. याचे विपरीत परिणाम ग्राहक आणि शेतकरी यांना भोगावे लागत  आहेत. या समस्यांवर निराकरणासाठी खालील बाबींचा नियोजनात अंतर्भाव करण्यात यावा.

1. शेत मालाची काढणी व विक्रि नियोजन:

सद्यस्थितीमध्ये शेतमालाच्या काढणी आणि विपणनाचे नियोजन हे गाव पातळीवर करणे आवश्यक आहे. सदर शेतमालाचे कमी वजनाचे पॅकिंग करुन आवश्यकतेनुसार वाहतूक करणे सोयीस्कर होईल.

2. शेतकरी उत्पादक संघ / गटामार्फत विक्री

केंद्राच्या धर्तीवर राय शासनाचेही शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक संघ / गटामार्फत शेतमालाची विक्री ई-नाम व्दारे करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. तसेच ग्राहकसेवेसाठी व्हाटसअ‍ॅप इ. साधनांचा वापर करावा यासाठी शहर आणि गाव पातळीवर तरुण स्वयंसेवक, बिगर शासकिय संस्था, सामाजिक संस्था यांचा समावेश करण्यात यावा. सामाजिक साधनांच्या संदर्भात प्रसार आणि जागृतीसाठी आकाशवाणी, एफ.एम.,  दुरचित्रवाणी यांचा प्रभावीपणे उपयोग होईल.

या उत्पादनासाठी [उदा. पीठ, दाळी, तेल इ.] शेतमालावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे त्यासाठी कमीत कमी मनुष्यबळ वापरुन जिल्हा पातळीवर नियोजन केल्यास उत्पादन आणि वाटप करणे शक्य होईल. शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक संघ / गटांच्या सबळीकरणाची आवश्यकता आहे.

3. शेतमाल वाहतूकिचे नियोजन :

शेतमाल बाजार समित्यांमधील अतिरिक्त गर्दी आणि आपत्ती कायद्याचे उल्लंघन टाळण्यासाठी अशा ठिकाणी पोहचणा-या वाहनांस पुर्व आरक्षण आणि ई-पासेस प्रणालीव्दारे नियोजीत केले जावू शकते. यामुळे बाजार समितीमध्ये येणा-या वाहनांच्या संख्येवर नियंत्रण राखता येवू शकेल. त्याचप्रमाणे बाजार समिती त्यांच्या कार्यक्षेत्रात विविध भागांसाठी प्रवेशाची वेळ निश्चित केल्यानेही मोठया  प्रमाणात गर्दी नियंत्रणात येवू शकते. सदर नियोजन प्रत्येक बाजार समितीमार्फत करण्यात यावे.

4. निवीष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन :

आगामी खरीप हंगामाच्या पुर्वतयारीसाठी उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे वाहतूक पर्व आरक्षण आणि ई पासेस प्रणालीव्दारे नियोजीत केली जावू शकते, यामुळे पुरेशी उपलब्धता आणि काळा बाजार रोखणे शक्य होईल.

5. पीक कर्जाची उपलव्धता :

आगमी खरीप हंगामात शेतक-यांना शेती पुर्ण क्षमतेने करण्यासाठी कर्जाची खुप मोठया प्रमाणात आवश्यकता असणार आहे. याव्यतिरिक्त सध्या त्यांच्यावर असलेल्या कर्जाबाबतीत योग्य व्यवस्थापन करणेही महत्वाचे आहे.

जिल्हा पातळीवर सर्व गोदामे शासन अखत्यारित आणल्यास सदर मालाची योग्य साठवणूक करता येईल. त्याचप्रमाणे शेतक-यांना या गोदामात ठेवलेल्या मालाच्या पावती आधारे कर्ज उपलब्ध करवून दिले जावू शकते,  याबाबत शेतक-यांमध्ये जागृकता वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत फळांची हाताळणी विषयी मार्गदर्शन

1. द्राक्ष :

 • द्राक्ष घडांची काढणी सकाळी किंवा सायंकाळी करावी.
 • काढणी केल्यानंतर घड जास्तवेळ शेतात / बागेत ठेवू नयेत.
 • घड वायूविजन असलेल्या सीएफबी पेटयांमध्ये भरुन पेटया बंद कराव्यात.
 • पेटया थंड तापमाणास ठेवून पूर्व शीतकरण करावे व लगेचच 0 ते 2 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आर्द्रता असलेल्या शीतगृहात [कोल्डस्टोरेज] दोन महिन्यापर्यंत ठेवता येतात.
 • द्राक्षापासून उत्तम प्रतीचा बेदाणा तयार करता येतो.
 • थॉम्पसन सिडलेस, तास-ए-गणेश, सोनाक, माणिक चमण इ. जाती बेदाण्यासाठी उत्तम आहेत.

2. आंबा :

 • पाड लागल्यावर  झेल्याच्या सहाय्याने इजा न करता फळाची काढणी देठासहीत सकाळी किंवा सायंकाळी करावी.
 • फळे काढल्यानंतर बागेत जास्त वेळ न ठेवता पॅकिंग हाऊसमध्ये आणावित.
 • थंड पाण्यात ठेवून फळांचे पूर्वशितकरण करावे व फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवावीत.
 • द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे  वायूविजन असलेल्या सीएफबी पेटयामध्ये किंवा व्रेटमध्ये ठेवून, 10-12 अंश सेल्सीयस तापमानास व 85-90 टक्के आद्रतेत शीतगृहात एका महिन्यापर्यत साठविता येतात.
 • कच्च्या आंब्यापासून लोणचे, आमचूर व पन्हे तयार करता येते.
 • पिकलेल्या आंब्यापासून आंबापोळी व गर [पल्प] काढून वर्षभर साठवून ठेवता येतो.

3. चिक्कु :

 • काढणीस तयार झालेली फळे  झेल्याच्या सहाय्याने इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी काढावीत.
 • फळे सावलीत आणून पसरुन ठेवावीत.
 • फळे थंड झाल्यावर व्रेटमध्ये किंवा 0-2 टक्के वायूविजन असलेल्या 150 गेजच्या पॉलिथीनच्या पिशविमध्ये भरावीत.
 • पिशव्या बंद करुन 18-20 अंश सेल्सीयस तापमानास ठेवल्यास 15 दिवसापर्यंत उत्तमरित्या साठविता येतात.
 • पिकण्यास सुरुवात झालेल्या चिक्कु पासून कॅन्डी व गोड चटणी करता येते व पिकलेल्या चिक्कुपासून पावडर तयार करता येते.

4. केळी :

 • केळाला गोलाई येवून लागल्यावर, इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी काढावीत.
 • घड सावलीत आणल्यानंतर इजा न करता फण्या वेगळया कराव्यात.
 • फण्या थंड झाल्यावर 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.
 • द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर व्रेटमध्ये ठेवून, 14-15 अंश सेल्सीयस तापमानास व 85 टक्के आद्रतेत शीतगृहात तीन आठवडयापयर्र्ंत साठविता येतात.
 • केळीपासून वेफर्स, सुकेळी व पावडर  तयार करता येते.

5. कागदी लिंंबू :

 • फळे पोपटी रंगाची असताना इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी काढावीत.
 • काढलेली फळे सावलीत आणून पसरुन ठेवावीत.
 • फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.
 • द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे एक किलो क्षमतेच्या 0-2 टक्के वायूविजन असलेल्या 150 गेजच्या पॉलिथीनच्या पिशविमध्ये भरावीत किंवा व्रेटमध्ये भरावीत.
 • या पिशव्या 8-10 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आर्द्रता असलेल्या शीतगृहात 40-45 दिवस ठेवता येतात.
 • कागदी लिंबापासून लोणचे, गोड चटणी, कॉर्डियल सिरप इ. पदार्थ तयार करता येतात.

6. मोसंबी :

 • फळांना पिवळसर रंग दिसू लागल्यावर इजा न करता, देठ ठेवून सकाळी किंवा सायंकाळी काढावीत.
 • फळे पिरगाळून काढू नयेत.
 • फळे सावलित आणल्यानंतर हवेशीर व मोकळया जागेत पसरुन ठेवावीत.
 • कागदी लिंबाप्रमाणेच फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.
 • द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे व्रेटमध्ये भरावीत.
 • व्रेट 8-10 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आर्द्रता असलेल्या शीतगृहात एक महिन्यापर्यंत ठेवता येतात.
 • मोसंबी फोडी काढून फ्रोजन करता येतात तसेच मार्मालेड, रस, सिरप व कार्बोनेटेड शीत पेय तयार करता येतात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेत पिकाचे काढणी पश्चात नियोजन

 • धान्य पिके शेतातून काढल्यानंतर साफ व स्वच्छ करुन धान्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के पर्यंंत कमी होईपर्यंत सूर्यप्रकाशात वाळवून साठवावीत.
 • बीज उत्पादनासाठी धान्याचा वापर करावयाचा असेल तर अशा धान्य पिकांची काढणी वेेगळी करुन साफ व स्वच्छ करुन धान्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के पर्यंंत कमी होईपर्यंत सूर्यप्रकाशात वाळवून साठवावीत.
 • तृणधान्य पिकापासून वेगवेगळे पदार्थ जसे पीठ, रवा, नाचणी सत्व, कुरडया, पापड, चकली, बिस्कीटे इत्यादी तयार करुन बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार वेष्टण करुन पुरवठा करावा.
 • कडधान्य पिकापासून डाळी, पीठ इत्यादी सारखे उपपदार्थ इत्यादी तयार करुन बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार वेष्टण करुन पुरवठा करावा.
 • तेल बियांपासून तेल घाणीचा वापर करुन बाजारपेठेच्या मागणीनुसार तेल काढून वेष्टण करुन पुरवठा करावा.
 • कांदा काढणी साठी आला असल्यास काढणी करुन शेतात 3 ते 4 दिवस सुकवावा नंतर पात कापून 2 ते 3 आठवडे सावलीत सुकवून प्रतवारी करुन कांदा चाळीमध्ये हवेशीर साठवावा.
 • लसून काढणी झाल्यानंतर व्यवस्थित सुकवून जुडया बांधून हवेशीर निवा-याला बांधून ठेवाव्यात.
 • करोनाच्या परिस्थितीमुळे फळे व भाजीपालांना बाजार पेठेच्या मागणी नुसार कमीत कमी हाताळणी करुन, वेष्टण करुन पुरवठा करण्यात यावा.
 • फळांची काढणी योग्य परीपक्वतेला करुन योग्य त्या तापमानाला व आर्द्रतेला व्यवस्थित साठवावीत.
 • काही फळांचे बाजार पेठेच्या आवश्यकते नुसार लगदा, रस, सिरप, स्क्वॅश इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ हवाबंद डब्यामध्ये किंवा बाटल्यांमध्ये साठवून पुरवठा करावा.
 • काही फळांपासून लोणची, कॅण्डी, वाळविलेले तुकडे किंवा फळांची भुकटी करुन व्यवस्थित साठवून बाजार पेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
 • आंबा पिकापासून आमचूर, लोणचे, मुरंब्बा, आंबा गर, आंबा पोळी इत्यादी प्रक्रिया युक्त पदार्थ बनवून साठवून बाजार पेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
 • द्राक्षांपासून बेदाणा तयार करुन शीत कक्षामध्ये साठवावा.
 • बटाटा व केळी सारख्या पिकांपासून चीप्स/वेफर्स तयार करुन वाळवून साठवावीत.
 • काही फळभायांचे तुकडे करुन वाळवावीत, भुकटी करावी व साठवून बाजार पेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
 • भाजीपाला तसेच मेथी, कडीपत्ता, पालक, कोथंबीर इत्यादी वाळवून हवाबंद साठवावीत.
 • लाल मिरची व्यवस्थित सुकवून साठवावीत.
 • आवळा, शतावरी, गवती चहा, अश्वगंधा, हिरडा,बेहडा इत्यादी वाळवून त्यांची पावडर करुन साठवावी.
 • हळद काढणीला आली असल्यास शिजवून, वाळवून, पॉलीश करुन साठवून ठेवावीत.
 • करोनाच्या परिस्थितीमुळे शहरामध्ये फळे व भाजीपाल्यांचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत आहे, त्या परिस्थितीमध्ये शेतक-यांनी एकत्र येवून सोशल माध्यमांचा जसे व्हॉटस्अ‍ॅप, फेसबूक इत्यादींचा वापर करुन लोकांच्या आवश्यकतेनुसार विविध फळे व भाजीपाल्यांच्या टोपल्या बनवून लोकांपर्यंत पोहचावीत.

21.  फळे व भाजीपाल्यांपासून व्यापारी द़ृष्टया बनविण्यात येणारे प्रक्रियायुक्त पदार्थ खालील प्रमाणे

. क्र.

फळांचे नांव

व्यापारीदृष्ट्याा महत्वाचे पदार्थ

1)

आंबा

कच्च्या आंब्यापासुन निरनिराळ्याा प्रकारचे लोणचे, आंब्याच्या फोडी खारवुन टिकवणे, चटणी, आंबोशी, आमकुट, पन्हे, स्क्वॅश, सरबत आणि पिकलेल्या आंब्यापासुन आंबा पोळी (पापड) बर्फी, जॅम, नेक्टर, आंबा पाक, टॉफी, हवाबंदडण्यातील आमरस, हबाबंद डब्यातील फोडी, गोठवलेल्या आंबा फोडी.

2)

केळी

सुकेळी, भुकटी, वेफर्स, केळीचा पल्प, गोड वेफर्स इ.

3)

लिंबु

लोणची, स्क्वॅश, सरबत, लिंबुपाक, कॉर्डियल

4)

अंजीर

सुके अंजीर, जॅम, अंजीर फळांचे हवाबंद डबे (कॅनिंग), अंजीर फळे पाकवीणे (कॅन्डी)

5)

आवळा

चवनप्राश, मोरावळा, लोणची, आवळा सुपारी, कॅन्डी, सरबत, पल्प, आवळा चहा.

6)

चिंच

कार्बोनेटेड पेय, जेली, चिंचोका काढुण वाळवलेला गर, चिंचेचा पल्प.

7)

डाळिंब

जेली, रस, सरबत, नेक्टर, डाळिंब पाक, आनारदाना, चुर्ण, फ्रोजनदाणे, डाळींबाच्या सालीची वाळवलेली भुकटी.

8)

पेरु

सरबत, पेरुगर, जेली, चॉकलेट (टॉफी) पेरु वडी

9)

चिकू

कच्च्या चिकुपासुन लोणचे, मध्यम पिकविलेल्या चिकुपासुन मुरांबा आणि कॅन्डी, पिकलेल्या चिकु फळांपासुन सरबत, स्क्वॅश, जॅम, चटणी वाळविलेल्या फोडी, चिकु भुकटी, मिल्क शेक.

10)

जांभुळ

रस, सरबत, स्क्वॅश, जॅम, बियांची भुकटी

11)

पपई

कच्च्या पपईपासून टुटीफुटी, पिकलेल्या पपईपासून जॅम, सरबत पेपेन.

12)

बोर

बोर खजुर, सुकविलेली फळे, बोरकुट, लोणचे, मुरब्बा, सरबत जॅम सिरप.

13)

संत्रा

सरबत, मार्मालेड, जेली, जॅम, सिरप, संत्रा फोडी डबाबंद करणे, संत्राच्या सालीपासुन वाळवलेली भुकटी

14)

द्राक्ष

किसमीस, मनुका, रस, सरबत, सिरप

15)

स्ट्रॉबेरी

जॅम डोली सरबत सिरप

16)

मोसंबी

रस, सरबत, सिरप

17)

सिताफळ

पल्प काढुन कमी तापमानाला साठवणे, आईस्क्रीम, मिल्कशेक

18)

टोमॅटो

केचप, सॉस, पेय, चटणी, पल्प भुकटी, पेस्ट

19)

मिरर्च (लाल)

वाळवलेली मिरची, लालमिरची पावडर, सॉस, लोणचे, चटणी

20)

मिरर्च (होरवी)

पावडर, लोणचे सॉस चटणी

21)

कोथंबीर

वाळलेली कोथंबीर, भुकटी

22)

पालक

वाळवलेली पालक, भुकटी

23)

मेथी

वाळवलेली मेथी

24)

बटाटा

वेगवेगळे वेफर्स, पावडर, वाळवलेले बटाटा फोडी

25)

वांगे

वाळलेल्या बारीक फोडी

26)

कांदा

पेस्ट, पावडर, वाळलेल्या चकत्या

27)

आले

पेस्ट, सुंठ, पावडर, लोणचे

28)

कोबीवफ्लॉवर

वाळवलेले तुकडे / चकत्या

29)

कढीपत्ता

वाळलेला कढीपत्ता, पावडर

30)

गाजर

हलवा, वाळलेले बारीक तुकडे

31)

वटाणा

गोठवलेला वटाणा, वाळलेला वटाणा

32)

कारली

लोणचे, भुकटी, रस

33)

भोपळा

पावडर, रस, हलवा

स्त्रोत: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी