लसूण लागवड तंत्रज्ञान - लागवड ते काढणी संपुर्ण माहीती​

लसूण लागवडीसाठी आवश्यक हवामान व जमीन, सुधारित जाती, मशागत, खत व पानी नियोजन, रोग व किडींचे नियंत्रण व काढणी, साठवण, विक्री संबंधी सखोल माहिती आहे.

कंदवर्गीय भाज्यांमध्ये लसूण हे महत्त्वाचे मसाल्याचे पीक म्हणून गणले जाते. लसणाचा वापर भाजी, चटणी, लोणची, पापड इत्यादींमध्ये केला जातो. लसणामध्ये 62 टक्के पाणी, 29 टक्के कर्बोदके, 6.3 टक्के प्रथिने तसेच स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम, गंधक आणि ’क’ जीवनसत्तव यांचे प्रमाण जास्त असते. न्यूमोनिया, अस्थमा, सांधेदुखी, पोटाचे विकार यांच्यावर लसूण गुणकारी आहे. लसणाची पावडर, निर्जलीकरण केलेल्या पाकळ्या आणि लसणाचा लगदा यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. 

हवामान जमीन : 

लसूण हे थंडीला चांगला प्रतिसाद देणारे पीक आहे. वाढीच्या काळात थंड आणि किंचित दमट हवामान, तर लसणाचा गड्डा परिपक्व होताना काढणीच्या काळात कोरडे हवामान हवे असते. देशभर महाराष्ट्रासह 90 टक्के लसणाची लागवड नोव्हेंबर महिन्यात होते. गड्ड्याची वाढ सुरु होण्यापूर्वी पानांची संख्या भरपूर असली आणि त्यांची वाढ चांगली झाली तरच अधिक उत्पन्नाची हमी असते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात रात्रीचे कमी तापमान रोपांच्या वाढीस पोषक ठरते. फेब्रुवारी-मार्च या काळात रात्री तापमान कमीच राहते, परंतु दिवसाच्या तापमानात वाढ होते. हवेतील आर्द्रता कमी होते आणि गड्डा पोसू लागतो. एप्रिल महिन्यात तापमान आणखी वाढते. या काळात गड्डे काढणीस येतात. या पिकाला जमीन भुसभुशीत आणि कसदार लागते. मध्यम काळ्या जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा चांगला असल्यास उत्पादन चांगले मिळते. भारी काळ्या किंवा चोपण जमिनीत गड्ड्याची वाढ चांगली होत नाही. पाण्याचा चांगला निचरा न होणार्या जमिनी टाळाव्यात.

भीमा ओमकार : 

कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने ही लसणाची जास्त उत्पादन देणारी चांगल्या प्रतीची जात नालंदा, बिहार या भागातून गोळा केलेल्या लसणांमधून निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीचे कंद माध्यम आकाराचे, घट्ट आणि पांढर्या रंगाचे असतात. एका कंदामध्ये 18 ते 20 पाकळ्या असून, एकूण विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण हे 41.2 टक्के इतके असते. लागवडीपासून 120 ते 135 दिवसांत पीक तयार होते. या जातीपासून 14 टन/हे. पर्यंत उत्पादन मिळू शकते.

भीमा पर्पल : 

लसणाची ही जात कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने इंगुल, ओडिशा येथून गोळा करण्यात आलेल्या लसणांतून निवड पद्धतीने विकसित केली आहे. हे वाण उत्तम प्रतीचे असून जास्त उत्पादन देणारे आहे. कंद मध्यम आकाराचे, घट्ट व जांभळ्या रंगाचे असतात. एका गड्ड्यामध्ये 16 ते 20 पाकळ्या असतात. एकूण विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण 33.6 टक्के असून, लागवडीपासून 135 ते 150 दिवसांत पीक तयार होते. या जातीपासून 17 टन/हे. पर्यंत उत्पादन मिळू शकते.याव्यतिरिक्त राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने गोदावरी, श्वेता व फुले बसवंत, तसेच नाशिक येथील राष्ट्रीय बागायती संशोधन व विकास प्रतिष्ठान या संस्थेने एग्रीफाउंंड व्हाइट, यमुना सफेद, जी-50 व जी-282 या सुधारित जाती विकसित केलेल्या आहेत.

पूर्वमशागत लागवड : 

जमीन तयार करणे : नांगरट करून नंतर 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. हरळी, लव्हाळ्याच्या गाठी आणि पूर्वीच्या पिकाची धसकटे वेचून घ्यावी. हेक्टरी 10 ते 15 टन शेणखत शेवटच्या कुळवाणीद्वारे जमिनीत मिसळून द्यावे. ठिबक सिंचनाकरिता 120 सें.मी. रुंदीचे, 40 ते 60 मी. लांबीचे व 15 सें.मी. उंचीचे गादीवाफे ट्रॅक्टरला जोडता येणार्या सरी यंत्राने तयार करावेत. सरी यंत्राच्या फाळाची दोन टोके 165 सें.मी. अंतरावर कायम करून ट्रॅक्टर चालविला तर 120 सें.मी. रुंदीचा गादीवाफा तयार होतो व वाफ्याच्या दोन्ही कडेला 45 सें. मी. रुंदीच्या दोन सर्या तयार होतात. या जागेचा उपयोग फवारणी करणे, गवत काढणे इत्यादी कामांसाठी होतो.

 बिज प्रक्रीया :

लागवडीपूर्वी 10 लिटर पाण्यात 25 मि.ली. कार्बेन्डाझिम व 20 मि.ली. कार्बोसल्फानच्या द्रावणात पाकळ्या दोन तास बुडवून मग लागवड करावी.

 लागवड पदधत व अंतर :

लसणाच्या पाकळ्या टोकण करून लावाव्या लागतात. वाफ्यात रुंदीशी समांतर दर 15 सें.मी. अंतरावर खुरप्याने रेघा पाडून त्यात 10 सें.मी. अंतरावर उभ्या पाकळ्या 2 सें.मी. खोलवर लावाव्यात व नंतर मातीने झाकून घ्याव्यात. पाकळ्या उभ्या लावल्यामुळे उगवण एकसारखी होते.

आंतरमशागत आणि तणनाशकांचा वापर : 

लसूण लागवडीनंतर 12 ते 15 दिवसांत उगवण होते. वाफ्यात वरून शेणखत घातले असेल आणि त्यात तणांचे बी जास्त असेल, तर लागवडीनंतर पहिल्याच आठवड्यात वाफे गवताने भरलेले दिसतात. खुरपणी त्वरित केली नाही तर बरेच नुकसान होते. अशावेळी तणनाशकांचा वापर उपयुक्त ठरतो. लसणामध्ये तणाचे बी रुजून येण्यापूर्वी मारावयाचे तणनाशक 15 मि.ली. ऑक्सिफ्लोरोफेन किंवा 25 मि.ली. पेंडीमिथॅलीन 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागते. तणनाशक फवारल्यानंतर लगेच पाणी द्यावे किंवा लागवड करून पाणी दिल्यानंतर दुसर्या दिवशी तणनाशक फवारले तरी चालते. तणनाशक फवारल्यानंतर त्याचा संपर्क पाण्याशी 1 ते 2 तासांत झाला पाहिजे. लागवडीसोबत तणनाशकाचा वापर केल्यामुळे जवळजवळ 30 ते 40 दिवस गवत उगवत नाही. त्यानंतर हलकी खुरपणी करणे आवश्यक असते. लव्हाळे किंवा हरळीसाठी ग्लायसिल वापरू नये. यांचा बंदोबस्त पूर्वमशागतीने होऊ शकतो. खोल नांगरट करून हरळीच्या काशा किंवा लव्हाळाच्या गाठी वेचणे हाच पर्याय वापरावा.

खत आणि पाणी नियोजन : 

लसणाच्या पिकाला 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश लागते. लागवडीपूर्वी 50 टक्के नत्र आणि संपूर्ण पालाश व स्फुरद द्यावे. नत्राची राहिलेली मात्रा दोन हप्त्यांत विभागून द्यावी. पहिली मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी, तर दुसरी मात्रा 45 ते 50 दिवसांनी द्यावी. सुपर फॉस्फेट किंवा अमोनियम सल्फेट या खतांचा वापर केल्यास आवश्यक तेवढ्या गंधकाची मात्रा पिकास मिळू शकते, अन्यथा 25 किलो गंधक वेगळे देणे आवश्यक आहे. त्यासाठी बेनसल्फ या खताचा वापर करावा. या पिकास पाणी जुजबी, परंतु नियमित लागते. पाकळ्या कोरड्यात लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे. उगवण झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. साधारणपणे 12 ते 15 पाण्याच्या पाळ्या लागतात.

रोग किडींचे नियंत्रण

तपकिरी करपा : पानावर पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पडतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. पिकांच्या बाल्यावस्थेत हा रोग आल्यास रोपांची वाढ खुंटून गड्डा लहान राहतो व प्रसंगी पूर्ण रोप मरते. या रोगाच्या बंदोबस्तासाठी दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 25 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 20 ग्रॅम कार्बेन्डाझिम 10 लिटर पाण्यात कीटकनाशकांसोबत आलटून पालटून फवारावे. फवारणीच्या द्रावणात चिकट द्रव्य जरूर वापरावे.

जांभळा करपापानावर सुरवातीला खोलगट लांबट, पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांच्या मधला भाग जांभळा व नंतर काळपट होतो. असे अनेक चट्टे एकमेकांना लागून पडल्यामुळे पाने काळी पडतात व वाळतात. या रोगाच्या बंदोबस्तासाठी दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 25 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 20 ग्रॅम कार्बेन्डाझिम 10 लिटर पाण्यात कीटकनाशकांसोबत चिकट द्रव्य मिसळून आलटून पालटून फवारावे.

पांढरी कूज : ही बुरशी जमिनीत वाढते. लागण झालेल्या रोपांचा गड्डा कुजतो. पाने पिवळी पडून रोपे कोलमडतात. गड्डा तयार झाल्यानंतर उशिरा रोगाची लागण झाल्यास साठवणीत गड्डा सुकतो, पोचट होतो. या रोगाच्या बंदोबस्तासाठी पिकाची फेरपालट करावी. लागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे. लागवडीपूर्वी ट्रायकोप्लस एकरी 3 किलो याप्रमाणात वाफ्यात मिसळावे.

फुलकिडे किंवा टाक्या : फुलकिडे कांद्याप्रमाणे लसणातदेखील मोठे नुकसान करतात. पूर्ण वाढलेली कीड व किडीची पिले पानांतून रस शोषून घेतात. त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात. पाने वाकडी होऊन नंतर वाळतात. या किडीची पिले व प्रौढ दिवसा पानाच्या बेचक्यात लपून राहतात आणि रात्री पानांतून रस शोषतात. पाकळ्या उगवून आल्यानंतर एकरी 4 किलो थिमेट किंवा कार्बोफ्युरान 10 जी हे कीटकनाशक वाफ्यात घालावे व पाणी द्यावे, तसेच दर 12 ते 15 दिवसांनी 10 लिटर पाण्यात 10 मिली. डायमेथोएट किंवा 10 मिली. सायपरमेथ्रीन चिकट द्रव्यासह आलटून पालटून फवारावे.

कोळीही कीड लसणाच्या पानांमधील रस शोषून घेत असल़्याने पाने आत वळून वाकडी होतात. रोपांची वाढ खुंटते, गड्डा लहान राहतो. गड्डे तयार झाल्यानंतर ज्या रोपांना कोळी या किडीचा उपद्रव झाला नाही, असे गड्डे बियाण्यांसाठी वापरावेत. तसेच गड्डे साठविण्यापूर्वी त्यांना मिथाईल ब्रोमाईडची दोन तास धुरी दिल्यास या किडीचा बंदोबस्त होतो.

सूत्रकृमीसूक्ष्म आकाराच्या कृमी लसणाच्या खोडालगत पेशीमध्ये शिरतात. पेशीचा भाग पोखरतात व तो भाग भुसभुशीत बनतो, सडतो आणि त्याला वास येतो. खोडाचा भाग सोडल्यामुळे झाड सहज उपटून येते व मुळाचा भाग तसाच जमिनीत राहतो. सूत्रकृमींच्या बंदोबस्तासाठी पिकाची फेरपालट हा अत्यंत प्रभावी उपाय आहे.

काळी बुरशी किंवा काजळी : साठवणीमध्ये लसणावर व पापुद्य्रा आत काळी बुरशी वाढते. त्यामुळे भाव कमी मिळतो. पिकांची फेरपालट करणे, तसेच शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा वापरणे यामुळे हा रोग कमी होऊ शकतो.

काढणी, साठवण विक्री : 

लसणाचे पीक साधारणपणे 120 ते 150 दिवसांत काढणीस तयार होते. गड्ड्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानांची वाढ थांबते. पाने पिवळी पडतात व शेंडे वाळतात. जमिनीच्या लगत मानेचा भाग मऊ होऊन पाने जमिनीवर पडतात. मानेमध्ये लहानशी गाठ तयार होते. यालाच लसणी फुटणे असे म्हणतात. पाने पूर्ण वाळण्यापूर्वी लसणाची काढणी करावी. लसूण लहान कुदळीने किंवा खुरपीने खोदून काढावा. गड्ड्यांची प्रतवारी करावी. तसेच 20 ते 30 सारख्या आकाराच्या गड्ड्यांची जुडी बांधावी. पानांची वेणी बांधून घ्यावी. अशा जुड्या 10 ते 15 दिवस सावलीत सुकवाव्यात. त्यानंतर साठवण करावी. साठवणीसाठी हवादार साठवणगृहाचा वापर करावा. वेण्या बांधलेला लसूण बांबूवर टांगून ठेवल्यास चांगला टिकतो. माल जास्त असेल तर लसणाचे 3 ते 4 फूट व्यासाचे व 4 फूट उंचीचे गोलाकार ढीग रचून ठेवावे. लसणाच्या गड्ड्याचा भाग ढिगाच्या बाहेरच्या बाजूवर व पानांचा भाग आतल्या बाजूवर अशाप्रकारे जुड्या एकमेकांवर गोलाकार रचाव्यात. दोन ढिगांमध्ये फिरण्याइतके अंतर ठेवावे. त्यामुळे हवा खेळती राहून साठवण चांगली होते. साठवणीपूर्वी साठवणगृहात (चाळीत) कार्बेन्डाझिमची फवारणी करावी. अशापद्धतीने लसूण 5 ते 6 महिने चांगला टिकून राहतो. विक्री करताना मानेचा व मुळाचा भाग कापून घ्यावा. गड्ड्यांची प्रतवारी करावी. पोचट झालेले, पिवळे पडलेले किंवा काळ्या बुरशीची लागण झालेले गड्डे वेगळे काढावे. चांगले निवडलेले लसणाचे गड्डे 25 किलो क्षमतेच्या जाळीदार लिनो बॅगमध्ये भरून विक्रीसाठी तयार करावे. अशाप्रकारे लसणाचे आधुनिक लागवड तंत्रज्ञान वापरून चांगल्या गुणवत्तेचा लसूण बाजारात आणल्यास त्याला चांगला बाजारभाव मिळतो.