करडई लागवड तंत्रज्ञान - लागवड ते काढणी संपुर्ण माहीती

करडई लागवड प्रस्तावना:
रब्बी पिकाची निवड करताना कमी  पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणा-या आणि अवर्षणाचा ताण सहन करणा-या पिकाचा विचार  केल्यास करडईसारखे फायदेशीर पीक दुसरे जाणारे करडई हे प्रमुख पीक आहे. वास्तविक पाहता हे करडई तेल आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. करडईच्या तेलात असंपृक्त आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे म्हणून हृदयरोग असणा-यांसाठी करडई तेल उत्तम आहे.  करडईचे तेल आरोग्यदायी असल्यामुळे तसेच त्याचे क्षेत्रही मर्यादित असल्यामुळे आणि मागणी जास्त असल्यामुळे भाव कमी होणार नाहीत. त्यात वाढ होईल किंवा दर सध्याच्या ठिकाणी स्थिर राहतील. ज्वारी पिकापेक्षा करडई पिकासाठी कमी मजूर लागतात. करडई पिकाचा उत्पादनखर्च कमी असल्यामुळे त्यापासून जास्त फायदा मिळतो तसेच करडईचे तेल आरोग्यदायी असल्यामुळे शेतक-यांनी स्वत:ला लागणा-या गरजेएवढी तरी करडई पिकवावी.
 करडई पीक लागवडीचे फायदे :
करडई पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे तीन फुटांपेक्षा जास्त खोलीतील ओलावा व अन्नद्रव्ये शोषून घेतली जातात. त्यामुळे अवर्षणप्रवण परिस्थितीत कमी पावसाच्या वेळेस या पिकापासून हमखास उत्पादन मिळते. या पिकाच्या पानांचा आकार पूर्ण वाढीनंतर कमी होऊन कडेने काटे येतात. त्यामुळे झाडातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन अवर्षणात चांगल्या प्रकारे तग धरुन राहते. पानांवर मेणचटपणा असल्यामुळे देखील बाष्पीभवन कमी होते. त्यामुळे करडई हे पीक दुष्काळी विभागासाठी वरदानच ठरते.करडई पिकास जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर पाण्याची गरज भासत नाही. परंतु टंचाईच्या काळात पिकास एक ते दोन पाण्याची आवश्यकता असते, परंतु गव्हाचा विचार केल्यास त्यास पाच-सहा पाणी लागतात. म्हणजेच एक एकर गव्हाऐवजी आपण दोन-तीन एकर करडई झाल्या पीक घेऊ शकतो आणि त्यापासून जास्त फायदा घेता येतो.  तसेच वारंवार गहूपीक घेतल्यामुळे जमिनीच्या वरच्या  थरातील अन्नद्रव्ये वापरली जातात. अशा ठिकाणी थरातील अन्नद्रव्याचा आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करता येईल आणि अधिक फायदा होईल खरीप पिकानंतर रब्बी हंगामात दुसरे पीक घ्यायचे असेल आणि ओलावा ठराविक प्रमाणात असेल तर करडई हे एक उत्तम पर्याय आहे

सुधारित लागवड तंत्रज्ञान:

कोरडवाहु क्षेत्रामध्ये रब्बी हंगामातील तेलबियाचे पिक म्हणजे करडई होय. करडई हे पीक कमी पाण्यात येणारे व अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. करडईची मुळे ही जमिनीमध्ये खोल जात असल्यामुळे, हे पीक खालच्या थरातील अन्नांश व ओलाव्याचा उपयोग करुन घेते. या पिकाच्या पानावर काटे येत असल्यामुळे पर्णोत्सर्जन कमी होते व प्रतिकुल परिस्थितीत हे पीक तग धरते. या पिकासाठी कमी मजुर लागत असल्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो. त्यामुळे हे पीक कोरडवाहूसाठी वरदान ठरले आहे. करडईच्या लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास या पिकापासुन अधिक फायदा मिळवता येतो.

महाराष्ट्रातील करडई पिकाखालील क्षेत्र कमी होण्याची प्रमुख कारणे:

 • शिफारशीत खतमात्राचा अभाव.
 • हलक्या जमिनीत करडईची लागवड.
 • करडईचे पीक एकाच जमिनीत सलग घेतले जाते.
 • स्थानिक वाणांचा वापर.
 • संकरित व सुधारीत वाणांचे बियाणे सहज उपलब्ध न होणे.
 • मावा किडीचे तसेच मर व करपा रोगाचे नियंत्रण वेळेवर न होणे.
 • करडईची पेरणी उशिरा किंवा लवकर करणे.
 • काटेरी झाडांमुळे काढणी मजुरांचा अभाव, तसेच यांत्रिकीकरणाची दुर्मिळता.
 • बाजारभावातील लवचिकतेचा अभाव.
 • करडईच्या तेलबियामध्ये असणारे तेलाचे कमी प्रमाण.

या विविध कारणांमुळे करडईचे क्षेत्र कमी होत चालले असले तरी हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे तसेच अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. या पिकाच्या लागवडीकरीता आधुनिक तंत्राचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते.

जमिन 

करडईच्या पिकास मध्यम ते भारी खोल जमीन निवडावी. ६० सें.मी.पेक्षा जास्त खोल जमिनीत करडईचे पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि ओलावा टिकवून ठेवणारी असावी. पाणी साचून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो. थोड़याफार चोपण जमिनीतही हे पीक येऊ शेकते.

 

पुर्वमशागत

भारी जमिनीत तीन वर्षातुन एकदा खोल नांगरट करावी व हेक्टरी 5 टन शेणखत टाकावे. दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या (उभ्या आणि आडव्या) देवुन जमीन भुसभूशीत करावी.

सुधारित वाण

महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत करडई संशोधन प्रकल्प, सोलापुर येथे विकसित झालेली भीमा ही जात कोरडवाहु क्षेत्रासाठी प्रसारित करण्यात आलेली आहे. चांगले पाऊसमान झाल्यास किंवा ओलीताखाली याच प्रकल्यातून सन 2004 मध्ये फुले कुसुमा हा वाण प्रसारित करण्यात आलेला आहे. तसेच डी.एस.एच.-129 हा संकरित वाण संपूर्ण भारताकरीता तेलबिया संचालनालय, हैद्राबाद येथुन प्रसारीत करण्यात आलेला आहे. बिनकाट्याच्या जातीमध्ये फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्था यांनी नारी-6 हा सरळ वाण आणि नारी एन. एच.-1 हा संकरित वाण प्रसारीत केलेले आहेत. त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र

वाण              

कालावधी (दिवस)

उत्पादन (क्विंटल)

विशेष गुणधर्म

1

भीमा       

130-135

14-16

कोरडवाहु क्षेत्रास योग्य

2

फुले कुसूमा

135-140

15-17

कोरडवाहु तसेच संरक्षित पाण्याखाली क्षेत्रास योग्य

3

एस.एस.एफ.-658

115-120

12-13

बिगर काटेरी, आखिल भारतीय स्तरावर लागवडीस योग्य

4

एस.एस.एफ.-708

115-120

13-15

पश्चिम महाराष्ट्रात लागवडीस योग्य

5

एस.एस.एफ.-733

120-125

13-15

कोरडवाहु लागवडीस योग्य

6

पी.बी.एन.एस.12

135-137

12-15

मराठवाडा विभागास योग्य

7

नारी-6

130-135

10-12

बिन काट्याची, पाकळ्या गोळा करण्यास योग्य

8

नारी एन.एच.-1

130-135

12-14

संकरीत वाण, पाकळ्या गोळा करण्यास योग्य

9

डी.सी.एच.-185

130-140

14-16

आखिल भारतीय स्तरावर लागवडीस योग्य

10

एस.एस.एफ.-748  (फुले चंद्रभागा)

125-140

13-16

कोरडवाहु तसेच बागायती क्षेत्रास योग्य, आखिल भारतीय स्तरावर लागवडीस योग्य

पेरणीची वेळ

करडईची पेरणी योग्य वेळी करणे फार महत्वाचे आहे. लवकर पेरणी (सप्टेंबर पहिला पंधरवडा) केल्यास पिकाचे पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगामुळे फार नुकसान होते आणि पर्यायाने उत्पादक घट येते. या उलट उशिरा पेरणी केल्यास (ऑक्टोंबरचा दुसरा आठवडा) पीक वाढीची अवस्था थंडीच्या काळात आल्यामुळे माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि उत्पादनात घट येते. त्यासाठी काडईची पेरणी सप्टेंबरच्या दुसरा पंधरवडा ते आक्टोंबरचा पहिला आठवड्यापर्यंत करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. बागाईत करडईची पेरणी आक्टोंबर अखेरपर्यंत करावी.

पेरणीचे अंतर व  बियाणे

कोरडवाहू क्षेत्रात दोन ओळीतील अंतर 45 सें.मी. आणि दोन रोपातील अंतर 20 सें.मी. ठेवावे. करडई या तेलबिया पिकाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी.प्रति हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे पुरेसे होते.

बीजप्रक्रिया

थायरम किंवा कॅप्टन किंवा बाविस्टीन 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे म्हणजे उगवणीनंतर करडईचे पीक बुरशीजन्य रोगास बळी पडणार नाही तसेच अॅझोटोबॅक्टर अथवा अझोस्पिरीलम 250 ग्रॅम अधिक पी.एस.बी. 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास वापरल्यास हवेतील नत्र स्थिरीकरण होऊन उत्पादनात वाढ होते.

आंतरपीक पध्दत

सोलापुर येथील अखिल भारतीय तेलबिया करडई संशोधन प्रकल्पातंर्गत केलेल्या संशोधनावरुन हरभरा + करडई (6:3 ) आणि जवस हे करडई (4:2) या आंतरपीक पध्दती फायद्याच्या असल्याचे दिसून आले आहे.

रासायनिक खत मात्रा

करडई हे पीक रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. 50 किलो नत्र (110 किलो युरीया), 25 किलो स्फुरद (156 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 25 किलो पालाश (43 किलो म्युरेट आँफ पोटॅश) प्रति हेक्टरी देणे आवश्यक आहे. ही खते पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत. बागायती करडई पिकास 60 किलो नत्र + 30 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.

खताचे विविध नियोजन : कोणतेही एक प्रकारे दयावे

 1. DAP – 55 kg + Urea – 88 kg + MOP – 42 kg
 2. 20 : 20 : 20 – 125 kg + Urea – 55 kg
 3. 10 : 26 : 26 – 97 kg + Urea – 88 kg

आंतरमशागत

उगवणीनंतर 10 ते 12 दिवसांनी या पिकाची विरळणी करणे आवश्यक आहे. विरळणी करताना चांगले जोमदार रोपे ठेवावी. दोन रोपामधील अंतर 20 से.मी. ठेवावे. रब्बी हंगामात गरज असल्यास एखादी खुरपणी करावी. दोन ते तीन कोळप्याच्या पाळ्या देणे अतिशय गरजेचे आहे. पहिली कोळपणी 3 -या आठवड्यात फटीच्या कोळप्याने, दुसरी कोळपणी 5 व्या आठवड्यात अखंड पासाच्या कोळप्याने व तिसरी कोळपणी 8 व्या आठवड्यात दातेरी कोळप्याने करावी.

तणनाशकाचा वापर:

करडई पिकांतील तण नियंत्रणासाठी पिक उगवणीपुर्वी ऑक्झीफलोरोफेन हे तणनाशक 0.50 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणात फवारावे व पेरणीनंतर सहा आठवडयांनी एक खुरपणी करावी.

पाणी व्यवस्थापन

करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस पाणी कमी लागते. मध्यम ते भारी ज़मिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या पिकास पेरणी नंतर पाणी देण्याची गरज भासत नाही.  कालांतराने ओलावा कमी आला आणि पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी जमिनीस तडे जाण्यापूर्वी एक संरक्षित पाणी देणे अधिक चांगले. दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात येताना 55 ते 60 दिवसांनी द्यावे. पिकास पाण्याचा जास्त ताण पडू देऊ नये. तसेच भेगा पडल्यानंतर पाणी दिले असता पाणी जास्त प्रमाणात जमिनीत मुरते. जास्त पाण्यामुळे पीक मोठ्या प्रमाणात मर रोगास बळी पडते. म्हणुन करडई पिकास हलके पाणी द्यावे.


पीक संरक्षण

करडई पिकाचे माव्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अवर्षणप्रवण विभागात करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुस-या पंधरावड्यात केल्यास या किडीची तीव्रता बरीच कमी होते. मावा किडीच्या नियंत्रणासाठी ३० टक्के डायमिथोएट (१५ मि.ली. १o लीटर पाण्यात) या कीटकनाशकाची फवारणी करावी किंवा थायोमेथंक्झाम/ अॅसिटामिप्रीड ३ ते ४ ग्रॅम/ १o लीटर पाणी किंवा अॅसिफेट १६ ग्रॅम /१o लीटर पाणी किंवा क्लोथायनिडीन १ ग्रॅम/१० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. या पिकावर पानावरील ठिपके (अल्टरनेरिया) या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. पानावरील ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा काबॅन्डॅझिम + मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक २० गॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोगाची तीव्रता कमी झाली नाही तर १० ते १५ दिवसांनी वरीलप्रमाणे दुसरी फवारणी करावी तसेच पिकाची फेरपालट करावी म्हणजे रोगाचे नियंत्रण होते.

काढणी

साधारणपणे 130 ते 135 दिवसात करडईचे पीक पक्व होते. पाने व बोंडे पिवळी पडतात. पिकाची काढणी सकाळी करावी. हवेत आद्रता जास्त असल्याने दोणे गळत नाही व हाताला काटे टोचत नाहीत. कापणीनंतर झाडांची कडपे रचुन पेठे करावीत. ते पुर्ण वाळल्यानंतर काठीने बडवुन काढावे व नंतर उफणणी करून बी स्वच्छ करावे. काढणी गव्हाच्या एकत्रित काढणी व मळणी यंत्राने करावी. या यंत्राने काढणी अत्यंत कमी खर्चात आणि कमी वेळात करता येते व त्यापासुन स्वच्छ माल मिळतो. करडई काढणीसाठी एकत्रित काढणी व मळणी यंत्राचा प्राधान्याने वापर करून खर्च व वेळ वाचवता येतो.

उत्पादन:

मध्यम जमिनीत वरील सुत्रांचा अवलंब करुन लागवड केल्यास प्रति हेक्टरी 12 ते 14 क्विंटल आणि खोल जमिनीत 14 ते 16 क्विंटल उत्पादन मिळते. बागायती पिकापासुन 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.

काढणीनंतर करडईतील कडी-कचरा इत्यादी स्वच्छ करून उन्हात वळवावी . वळविल्यानंतर निर्जंतुक  पोत्यात भरून साठवण करावी. करडईचा उपयोग प्रामुख्याने तेल मिळविण्यासाठी केला जातो. खेड्यामध्ये तसेच शहरात बैलावर चालणारे तसेच विद्युत मोटारीवर चालणारे घाणे तेल काढण्यासाठी वापरतात. या पद्धतीत तेल काढले असता बियापासून पूर्णपणे तेल निघत नाही. करडई पेंडीमध्ये ३ ते ५ टक्क्यांपर्यंत तेल राहते. परंतु खेड्यात सर्रास ही पध्दती वापरली जाते.

करडई पिकांचे ईतर महत्व

बिया:

बियाचा वापर परदेशात प्रामुख्याने पाळीव तसेच जंगली पक्षांच्या खाद्यासाठी करतात. भारतात बियाचा उपयोग प्रामुख्याने तेलासाठी करतात. बियामध्ये २८ ते ३५ टक्के तेल असते. करडईच्या तेलात ‘लिनोलीक’ या असंपृक्तघटकाचे प्रमाण ७८ टक्के असते. करडईच्या तेलाच्या वापराने शरीरात कोलेस्टॅरॉलचे प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. रक्तदाब, हृदयविकार असणा-यांसाठी हे तेल उपयुक्त आहे. याशिवाय करडई तेलाचा उपयोग रंग तयार करणे, रेक्झीन तयार करणे, अन्न तयार करण्यासाठी, मार्गारीन बनविण्यासाठी तसेच खाद्यतेल म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो.

 

करडई पेंड :

जनावरांना पौष्टिक खाद्य म्हणून उपयोगी आहे. करडई बियाची टरफले सेल्युलेज व इन्सुलेशन तयार करण्यासाठी उपयोगात आणतात.

भाजी:

लहान अवस्थेत करडईचा भाजीसाठी वापर केला जातो. करडईच्या पानामध्ये ‘अ’ जीवनसत्व, लोह, स्फुरद आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. हिरवापाला जनावरांना चा-यासाठी वापरतात तर हिरव्या झाडापासून मुरघास करता येतो.

झाडे

खोडामध्ये लिओसिलीसिकचे प्रमाण जास्त असते म्हणून पार्टीकल बोर्ड पेपरसाठी लगदा तयार करण्यासाठी वापरतात. एकत्रित काढणी व मळणी यंत्राद्वारे काढणी केली असता झाडाच्या फांद्या, खोडाचे तुकडे, पाने इत्यादी शेतात विखुरले जातात. कुजल्यानंतर त्यांचा सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो.

 

करडई पाकळ्याचे गुणधर्म:

करडई पाकळ्यांना औषध म्हणून अतिशय महत्व आहे. सुकलेल्या पाकळ्याच्या औषधामुळे रक्त वाहिन्यामध्ये रक्तपुरवठा तसेच प्राणवायू मिसळण्याचे प्रमाण वाढून रक्त वाहिन्यात गिटुळ्या होण्याचे प्रमाण कमी होते. तसेच कोलेस्टेरॉलचे देखील प्रमाण कमी होते. त्याचबरोबर मधुमेह, हृदयविकार, स्पॉन्डॅलायसिस, उद्यरक्तदाब, मासिक पाळीतील इत्यादी रोग कमी होतात. चीनमध्ये पाकळ्यांचा उपयोग प्रामुख्याने औषधनिर्मिती, रंग निर्मिती व सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. पाकळ्यांपासून उत्तम प्रकारचा चहा तयार होतो.

 

 

विशेष बाब:

करडईच्या तेलात संपृक्त स्निग्ध आम्लाचे प्रमाण इतर तेलापेक्षा बरेच कमी असल्याने हृदय रोग्यांना हे तेल वापरणे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. या तेलाच्या वापरामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्रा प्रमाणाबाहेर वाढत नाही. वैद्यक शास्त्रात औषधोपचार म्हणुनु करडईच्या पाकळ्यांचा उपयोग केला जातो. मानवी शरीरातील रक्ताभिसरणाच्या कार्यक्षमतेवर करडईच्या पाकळ्यांचा इष्ट परिणाम होतो. रक्त वाहिन्यांमध्ये रक्त पुरवठा तसेच रक्तामध्ये प्राणवायूभिसरणाचे प्रमाण वाढुन रक्त वाहिन्यात गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते. हृद्यरोग्याच्या इलाजात करडई पाकळीयुक्त औषधांच्या वापरामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. मणक्याचे विकार, मानदुखी, पाठदुखी इत्यादीवर आयुर्वेदीक उपचारात करडई पाकळ्या इतर औषधासोबत वापरल्यास आराम मिळतो. करडई पाकळ्यांचा दररोज काढा काढुन पिल्यास वरील रोगांपासून बऱ्याच प्रमाणात फायदा होतो. करडईची फुले उमलण्यास सुरुवात होताच सायकोसिल या वाढ प्रतिरोधकाची 1000 पी.पी.एम. तिव्रतेच्या (1000 मिली 500 लिटर पाण्यात) या द्रावणाची फवारणी केल्यास उत्पादनात 15 ते  20 टक्के वाढ झाल्याचे प्रयोगाअंती दिसुन आलेले आहे.

Ref:

 

 1. डॉ. आदिनाथ ताकटे
  प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग), महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी.
 2. कृषि विभाग महाराष्ट्र.
 3. वनामकृवि, परभणी शिफारसी.